रेणापूर तालुक्यात रानडुकरांचा उपद्रव वाढला; ऊस पिकांचे मोठे नुकसान
लातूर, २२ जून (हिं.स.) : लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील विविध भागात रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतात घुसून रानडुकरे पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करत असल्याने शेतकऱ्यांचे आर
रानडुकराचा हैदोस


लातूर, २२ जून (हिं.स.) : लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील विविध भागात रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतात घुसून रानडुकरे पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

रेणापूर येथील प्रगतशील शेतकरी पंडित आबासाहेब माने हे दरवर्षी रासायनिक खतांचा कमी वापर करून ऊसाचे विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरी म्हणून पंचक्रोशीत परिचित आहेत. मात्र यंदा जून महिना सुरू होऊन २० दिवस उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने पिकांची जोपासना सुरू असतानाच रानडुकरांच्या वाढत्या वावरामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे समोर आले आहे.

तालुक्यातील काही भागात शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी रात्री शेतात पहारा देण्यास सुरुवात केली आहे. वाढत्या वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

वन विभागाने तातडीने पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande