
रत्नागिरी, 22 जून (हिं.स.) । हातखंबा-रत्नागिरी मार्गावरील खेडशी येथे झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाला. भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्यानंतर डंपर रस्त्यालगत सुमारे दहा फूट खोल खाली कोसळला.
जाकादेवी येथील पांचाळ कुटुंब दुचाकीवरून प्रवास करत असताना खेडशी येथे भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिला डंपरखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गावरून खाली कोसळले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, याच ठिकाणी काही वेळापूर्वी एका रिक्षाचाही अपघात झाला. सलग घडलेल्या अपघातांमुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी