
सोलापूर, 22 जून (हिं.स.)। थकीत ऊसबिलाची रक्कम मिळत नसल्याच्या नैराश्यातून एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मुस्ती येथील शेतकरी रामचंद्र आप्पाशा कळके यांनी आपल्या एक एकर क्षेत्रातील सुमारे 50 टन ऊस धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याकडे गाळपासाठी दिला होता. या उसापोटी त्यांना सुमारे 1 लाख 40 हजार रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, ऊस पुरवठा करून बराच कालावधी उलटल्यानंतरही त्यांना बिलाची रक्कम मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे.थकीत ऊसबिल मिळावे यासाठी त्यांनी वारंवार कारखाना प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यातून कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याने ते आर्थिक आणि मानसिक तणावाखाली होते. अखेर त्यांनी विष प्राशन केले.घटनेनंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.या घटनेमुळे शेतकरी वर्गात संतापाची भावना निर्माण झाली असून, थकीत ऊसबिलाच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा तसेच या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड