रायगड - ‘अमृत मानस मित्र’द्वारे मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी
रायगड, 23 जून, (हिं.स.)। विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक सक्षमीकरण आणि समुपदेशन सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत (AMRUT) यांच्या वतीने ‘अमृत मानस मित्र’ समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आ
15-day-training-official-cert


रायगड, 23 जून, (हिं.स.)। विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक सक्षमीकरण आणि समुपदेशन सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत (AMRUT) यांच्या वतीने ‘अमृत मानस मित्र’ समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे ही तांत्रिक व शैक्षणिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी हा उपक्रम महत्त्वाची संधी ठरणार आहे.

मानसिक आरोग्य, विद्यार्थी समुपदेशन, भावनिक आधार, संवाद कौशल्ये, सक्रिय श्रवण (Active Listening), सहानुभूतीपूर्ण प्रतिसाद, संकट व्यवस्थापन, जीवनकौशल्ये आणि मानससामाजिक सहाय्य या विषयांवर आधारित हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. सहभागी उमेदवारांना प्रत्यक्ष कार्यक्षम समुपदेशक म्हणून विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणाचे स्वरूप १५ दिवसांचे ऑफलाइन निवासी प्रशिक्षण असे असून ते पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात इंटरॲक्टिव्ह सत्रे, केस स्टडीज, प्रात्यक्षिक उपक्रम आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यानंतर एक महिन्याचा फील्ड एक्सपोजर देण्यात येणार असून सहभागी उमेदवारांना जिल्हा स्तरावरील शाळा किंवा महाविद्यालयांशी जोडले जाईल. पुढील तीन ते पाच महिन्यांच्या कालावधीत MIMH च्या तज्ज्ञांकडून नियमित ऑनलाइन मार्गदर्शन, सुपरव्हिजन, मेंटरिंग सत्रे, केस डिस्कशन तसेच व्यावसायिक सहाय्य दिले जाणार आहे.

प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अमृत आणि महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था यांचे संयुक्त अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार कौशल्याधारित शिक्षण, समाजाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगारक्षमतेवर भर देण्यात आला असून या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र, एम.ए./एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW) पदवीधारक उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित क्षेत्रात कार्यरत व अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह https://mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. पात्र उमेदवारांच्या अर्जांची छाननी करून ओरिएंटेशन सत्र, आवश्यक परीक्षा व मुलाखतीद्वारे अंतिम निवड करण्यात येणार आहे. पहिल्या बॅचसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ जून २०२६ आहे.

यासंदर्भात डॉ. कापसे (MIMH, पुणे) यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेता प्रशिक्षित समुपदेशकांची आवश्यकता पूर्वीपेक्षा अधिक आहे. ‘अमृत मानस मित्र’ प्रशिक्षण हा केवळ प्रमाणपत्र अभ्यासक्रम नसून प्रत्यक्ष कौशल्य विकास, फील्ड अनुभव, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि व्यावसायिक सहाय्य यांचा समन्वय साधणारा अभिनव उपक्रम आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात अर्थपूर्ण करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी ही निश्चितच सुवर्णसंधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande