
रायगड, 23 जून (हिं.स.)। तालुकास्तरावर दाद न मिळाल्यास जिल्हास्तरावर अर्ज करण्याची संधी रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी, अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांची तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात दुपारी १ वाजता हा लोकशाही दिन पार पडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींचे निवारण न्याय्य व प्रभावी पद्धतीने व्हावे, यासाठी शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त तसेच मंत्रालय स्तरावर लोकशाही दिन उपक्रम राबविण्यात येतो. या माध्यमातून नागरिकांना प्रशासनासमोर थेट आपली बाजू मांडण्याची संधी उपलब्ध होते.
जुलै २०२६ महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला असून अर्जदारांनी आपल्या वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारींसाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. संबंधित अर्ज दोन प्रतींमध्ये लोकशाही दिनाच्या किमान १५ दिवस आधी पाठविणे बंधनकारक राहणार आहे.
प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार, नागरिकांनी प्रथम तालुकास्तरीय लोकशाही दिनात तहसील कार्यालयाकडे आपली तक्रार सादर करावी. तालुकास्तरावर अर्ज दाखल केल्यानंतर ३० दिवसांच्या कालावधीत कार्यवाही न झाल्यास किंवा समाधानकारक निर्णय न मिळाल्यास संबंधित नागरिकाला जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे.
नागरिकांच्या समस्या व तक्रारींना प्राधान्याने न्याय मिळावा आणि प्रशासन व जनतेतील संवाद अधिक प्रभावी व्हावा, या उद्देशाने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असल्याने पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)