
मुंबई, 23 जून (हिं.स.)। मुंबईतील जोगेश्वरी पूर्व येथील दुर्गानगर परिसरात कथित साधूंना नागरिकांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. परिसरातील काही नागरिकांनी चार जणांना संशयाच्या आधारे पकडून त्यांची धुलाई केल्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चार जण गेल्या चार दिवसांपासून अंधेरी-जोगेश्वरी परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना दिसत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. परिसरात लहान मुलांचे अपहरण करण्यासाठी काही जण साधूंच्या वेशात फिरत असल्याची चर्चा पसरली होती. त्यामुळे पालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच संशयातून संतप्त नागरिकांनी या चौघांना घेराव घालत त्यांना पकडले आणि मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून चौघांची सुटका करून त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. सध्या या व्यक्तींची ओळख, त्यांचा नेमका उद्देश आणि परिसरातील हालचाली याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. अद्याप कोणत्याही अपहरण प्रकरणाशी त्यांचा संबंध असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, राज्यात १६ एप्रिल २०२० रोजी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे घडलेल्या साधू हत्याकांडाची आठवण या घटनेमुळे पुन्हा ताजी झाली आहे. त्या वेळी अफवांमुळे संतप्त जमावाने दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची निर्घृण हत्या केली होती. त्या घटनेमुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
जोगेश्वरीतील ताज्या प्रकरणानंतर पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास कायदा हातात न घेता तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule