अमरावतीत माता रुक्मिणी पालखीचे भक्तीमय स्वागत
यशोमती ठाकूर वारकऱ्यांसोबत फुगडीत सहभागी अमरावती, 23 जून (हिं.स.) : श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या माता रुक्मिणीच्या ऐतिहासिक पालखीचे सोमवारी सायंकाळी अमरावतीतील बियाणी चौकात माजी मंत्री अॅड. यशो
विठूनामाच्या गजरात अंबानगरी दुमदुमली


यशोमती ठाकूर वारकऱ्यांसोबत फुगडीत सहभागी

अमरावती, 23 जून (हिं.स.) : श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या माता रुक्मिणीच्या ऐतिहासिक पालखीचे सोमवारी सायंकाळी अमरावतीतील बियाणी चौकात माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण व भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. सर्वधर्मीय नागरिक, वारकरी आणि भाविकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे हा सोहळा सामाजिक एकात्मता आणि समतेचा संदेश देणारा ठरला.

माता रुक्मिणी पालखी सोहळ्याला तब्बल ४३२ वर्षांची परंपरा लाभली असून विदर्भातील ही एकमेव मानाची पालखी मानली जाते. त्यामुळे या पालखीला पंढरपूरमध्ये विशेष महत्त्व प्राप्त आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कौंडण्यपूरहून निघालेली पालखी अमरावतीत दाखल झाल्यानंतर तिचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

स्वागत सोहळ्यानंतर माजी मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळत भक्तिरसात सहभाग नोंदविला. यावेळी ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ तसेच ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या नामस्मरणात भाविकांनी भक्तीभाव व्यक्त केला.

या निमित्ताने भजन, नामस्मरण आणि भावगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी संप्रदायाची परंपरा, भक्ती आणि सामाजिक सलोखा यांचे दर्शन घडविणारा हा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कौंडण्यपूर ते पंढरपूर असा प्रवास करणाऱ्या या ऐतिहासिक पालखीमुळे अमरावती शहरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

यावेळी खासदार बळवंत वानखडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, शहर पोलीस आयुक्त राकेश ओला, निवासी जिल्हाधिकारी संतोष काकडे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, पोलिस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande