लखनऊ दुर्घटनेनंतर लातूरमधील कोचिंग क्लासेसच्या फायर सेफ्टीचा प्रश्न ऐरणीवर
लातूर, 23 जून, (हिं.स.)। लखनऊच्या अलीगंज परिसरातील कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या भीषण आगीत 15 हून अधिक विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. शिक्षणासाठी घराबाहेर पडलेली निष्पाप लेकरं काही क्षणांत आगीच्या
लखनौ दुर्घटना


लातूर, 23 जून, (हिं.स.)। लखनऊच्या अलीगंज परिसरातील कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या भीषण आगीत 15 हून अधिक विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. शिक्षणासाठी घराबाहेर पडलेली निष्पाप लेकरं काही क्षणांत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही केवळ दुर्घटना नसून फायर सेफ्टी नियमांकडे झालेल्या गंभीर दुर्लक्षाचे भयावह उदाहरण आहे.

या पार्श्वभूमीवर आता लातूरमधील शेकडो कोचिंग क्लासेस आणि शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी अरुंद जिने, आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांचा अभाव, अग्निशमन यंत्रणांची अपुरी व्यवस्था आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.

लखनऊमध्ये जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?

लातूरमधील सर्व कोचिंग क्लासेसचे फायर ऑडिट तातडीने केले जाणार का?

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलली जाणार का?

आज लातूरमधील हजारो विद्यार्थी विविध कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेत आहेत. पालक आपल्या मुलांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे, या विश्वासाने क्लासेसमध्ये पाठवतात. मात्र जर सुरक्षा व्यवस्थाच धोक्यात असेल, तर हा विश्वास किती दिवस टिकणार?

लखनऊसारखी घटना पुन्हा घडण्याची वाट पाहण्यापेक्षा प्रशासनाने तातडीने सर्व कोचिंग क्लासेस, वसतिगृहे आणि शैक्षणिक इमारतींचे विशेष फायर ऑडिट हाती घेणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे.

लखनऊतील आगीने देश हादरला; आता तरी लातूर प्रशासन जागे होणार का? हा प्रश्न आज प्रत्येक पालक, विद्यार्थी आणि नागरिक विचारत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी संबंधित विषयात कोणतीही तडजोड मान्य होणार नाही, हीच जनतेची अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande