
सोलापूर, 23 जून, (हिं.स.)। वाढत्या शहरीकरणामुळे सिमेंटच्या जंगलात हरवत चाललेल्या निसर्गाला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी आणि आगामी पावसाळ्यात हरित क्षेत्र वाढवण्याच्या उद्देशाने सोलापुरात रविवारी एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने 'इको फ्रेंडली क्लब'तर्फे स्मृती वन उद्यानात शेकडो सीडबॉल (बीजगोळे) तयार करण्यात आले.'निसर्ग आपल्याला भरभरून देतो, आता आपली वेळ आहे' या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाला पर्यावरणप्रेमी नागरिक, युवक आणि बालगोपाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अवघ्या दोन तासांत सहभागींच्या सहकार्याने शेकडो सीडबॉल तयार करण्यात आले.तयार करण्यात आलेले हे बीजगोळे आगामी आषाढी वारी तसेच विविध ट्रेकिंग मोहिमांदरम्यान सोलापूर परिसरासह महाराष्ट्रातील गड-किल्ले, डोंगररांगा आणि मोकळ्या माळरानांवर विखुरले जाणार आहेत. पावसाळ्यात या बिया रुजून भविष्यात मोठ्या वृक्षांचे रूप धारण करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी लक्ष्मण आवारे आणि सहायक वनसंरक्षक शुभांगी जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. वनपाल महेश हिरेमठ यांनी उपस्थितांशी संवाद साधत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.प्रारंभी इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक तथा वसुंधरा मित्र परशुराम कोकणे यांनी सीडबॉल तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. उपक्रमानंतर झाडांच्या शीतल सावलीत सर्वांनी एकत्र येत 'वनभोजन'चा आनंद लुटला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड