
रायगड, 23 जून (हिं.स.)। राज्यात पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे किंवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. पत्रकारांना धमकी देणे म्हणजे लोकशाहीला थेट आव्हान देण्यासारखे असून अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही माफी दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी मुंबईत
जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी फडणवीस यांनी उपरोक्त विधान केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांच्या सुरक्षेबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, लोकशाही व्यवस्थेत पत्रकार आणि माध्यमे हे चौथे स्तंभ मानले जातात. समाजातील विविध प्रश्न, जनतेच्या समस्या तसेच शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असतात. त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले, धमक्या किंवा दबाव टाकण्याचे प्रकार हे केवळ एखाद्या व्यक्तीवरचे हल्ले नसून लोकशाही मूल्यांवरचे आघात आहेत.
पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे, त्यांना आवश्यक संरक्षण मिळावे आणि अशा घटनांतील दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील तसेच राजकीय, सामाजिक किंवा इतर कोणत्याही दबावाला बळी न पडता दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पत्रकार संघटना आणि माध्यम प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत केले असून पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. राज्यातील पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतलेली कठोर भूमिका महत्त्वाची मानली जात असून त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)