
बीड, 23 जून (हिं.स.) : बीड नगर परिषदेला प्राप्त झालेल्या पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीचा योग्य व प्रभावी विनियोग व्हावा, यासाठी डॉ. योगेश यांच्यासह नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी विवेकजी जॉन्सन यांची भेट घेत विविध विकासकामांबाबत निवेदन सादर केले.
शिष्टमंडळाने शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आणि अग्निशमन सेवांच्या बळकटीकरणासाठी निधीचा वापर करण्याची मागणी केली. बीड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे थकीत वीजबिल भरून अतिरिक्त वीजभार मंजूर करून घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. यामुळे पूर्ण दाबाने वीज उपलब्ध होऊन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल, असे नमूद करण्यात आले.
तसेच अमृत अटल पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अपूर्ण राहिलेली क्रॉस कनेक्शन, मेन लाईन व सब-लाईन टाकण्याची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. शहरातील अनेक भागांमध्ये 15 ते 15 दिवसांनी होणारा पाणीपुरवठा चार ते पाच दिवसांवर आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.
ज्या भागांमध्ये पाईपलाईन टाकण्यात आली आहे, मात्र अद्याप पाणीपुरवठा होत नाही, अशा भागांचा सर्वेक्षण करून झोननिहाय आणि टाकीनिहाय अंदाजपत्रके तयार करावीत, अशी सूचनाही करण्यात आली. यासोबतच पाण्याच्या पुनर्वापराच्या योजना राबविण्यावर भर देण्यात आला.
घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेकडे स्वतःची जागा नसल्याने डंपिंग ग्राउंडसाठी जमीन खरेदी करण्याची मागणी करण्यात आली. शहर स्वच्छतेसाठी ट्रॅक्टर, कॉम्पॅक्टर, घंटागाडी आदी आवश्यक वाहने खरेदी करण्याबाबतही शिष्टमंडळाने आग्रह धरला.
याशिवाय बेसिक ग्रँटमधून अग्निशामक वाहने, उपकरणे व इतर अत्याधुनिक अग्निशमन साहित्य खरेदी करून अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्याची मागणी करण्यात आली. तसेच बीड पतंजली योग समितीच्या विविध मागण्यांसंदर्भातही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या भेटीदरम्यान शहर विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis