रायगड - पावसात सिमेंट पावडर ठरली घातक; १६ दुचाकींसह २० वाहनांचे नुकसान
रायगड, 23 जून (हिं.स.)। खालापूर तालुक्यातील कार्लेखिंड-रेवस मार्गावरील जांभूळपाडा आणि जलपाडा दरम्यान सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामामुळे आज सकाळी वाहनचालकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. रस्त्यावर टाकण्यात आलेली सिमेंट पावडर पावसाच्या
Cement powder proves hazardous in the rain; 20 vehicles, including 16 two-wheelers, damaged.


Cement powder proves hazardous in the rain; 20 vehicles, including 16 two-wheelers, damaged.


रायगड, 23 जून (हिं.स.)। खालापूर तालुक्यातील कार्लेखिंड-रेवस मार्गावरील जांभूळपाडा आणि जलपाडा दरम्यान सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामामुळे आज सकाळी वाहनचालकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. रस्त्यावर टाकण्यात आलेली सिमेंट पावडर पावसाच्या पाण्यात मिसळल्याने संपूर्ण मार्ग अत्यंत निसरडा बनला आणि अवघ्या काही वेळात तब्बल २० वाहने घसरून अपघातग्रस्त झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास सिमेंट पावडर आणि पावसाचे पाणी यांचे मिश्रण होऊन रस्ता अक्षरशः ‘स्केटिंग रिंग’ बनला होता. यामुळे १६ दुचाकी, ३ टेम्पो आणि १ एस.टी. बस घसरल्याच्या घटना घडल्या.

अपघातांमध्ये एका टेम्पोची रस्त्यालगतच्या झाडाला धडक बसली, तर एस.टी. बस चिखलात अडकून पडली. अनेक दुचाकीस्वार रस्त्यावर घसरले. मात्र, सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. काहींना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती आहे.

या अपघातांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक दुचाकींच्या पेट्रोल टाक्या फुटल्या, टेम्पोंचे बंपर तुटले, तर एस.टी. बसच्या काचांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्ते बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँक्रीट रस्त्याचे काम सुरू असताना आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना न केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित ठेकेदाराच्या कामावर योग्य देखरेख नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्ता सुरक्षित करण्यासह संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, रस्ता पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करताना वेगावर नियंत्रण ठेवून अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande