
चंद्रपूर, 23 जून (हिं.स.)। राजुरा तालुक्यातील गायेगाव येथील शेतकरी दिवाकर हिरामण पाहणपट्टे हा कर्जमाफी झालीच पाहिजे अशी ठाम आणि आक्रमक भूमिका घेत बैलावर स्वार होऊन थेट तहसील कार्यालयात पोहोचल्याची घटना मंगळवारी समोर आली.
कार्यालय परिसरात प्रवेश करताच उपस्थित नागरिक आणि कर्मचारी काही काळ अचंबित झाले. त्यानंतर शेतकऱ्याने कर्जमाफीच्या मागणीसाठी घोषणाबाजी करत आपली व्यथा मांडली. या शेतकऱ्याने बैलावर बसून संपूर्ण तहसील कार्यालय परिसरात फेरी मारली आणि कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय द्या अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकारकडून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात लाभ मिळण्यात विलंब होत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. बँका आणि प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे शासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव