
चंद्रपूर, 23 जून (हिं.स.)। गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने जलसंवर्धन, जलसंधारण आणि शाश्वत जलव्यवस्थापन क्षेत्रातील संशोधन, जनजागृती व समाजाभिमुख उपक्रमांना चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जल व्यवस्थापन अध्यासन केंद्राचा उद्घाटन समारंभ बुधवार, दि. २४ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या नवीन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे राहणार आहेत. उद्घाटक म्हणून अध्यक्ष, उमग ग्रामीण विकास संस्था, उमरा (जि. हिंगोली) जयाजी पाईकराव, उपस्थित राहतील. तसेच विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास व्यवस्थापन परिषद सदस्य गुरुदासजी कामडी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सदर कार्यक्रमास विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आणि केंद्राचे समन्वयक अनंता गावंडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव