
रायगड, 23 जून (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील मार्केवाडी येथे किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणी पाच जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी यांचा पुतण्या हा मयुरेश मंगल कार्यालयातून घरी जात असताना आरोपी क्रमांक १ व २ हे त्याला शिवीगाळ करत होते. आवाज ऐकून फिर्यादी, त्यांचे दीर आणि मुलगी घटनास्थळी गेले. त्यावेळी आरोपी क्रमांक ३, ४ व ५ हे देखील तेथे उपस्थित होते.
सर्व आरोपींच्या हातात लोखंडी रॉड व लाकडी काठ्या असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करण्याचे कारण विचारत समजावण्याचा प्रयत्न केला असता वाद अधिकच वाढला. आरोपी क्रमांक १ याने लोखंडी रॉडने फिर्यादींच्या पुतण्याच्या डोक्यावर व पाठीवर वार करून दुखापत केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपी क्रमांक ३ याने लाकडी काठीने त्याच्या हातावर मारहाण केली व चावल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
याचवेळी आरोपी क्रमांक १ याने फिर्यादींच्या मुलीच्या पोटात लाथ मारली, तर आरोपी क्रमांक २ हिने तिचे कपडे फाडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भांडण सोडविण्यास गेलेल्या फिर्यादींच्या दिरालाही मारहाण करण्यात आली. तसेच सर्वांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)