
परभणी, 23 जून (हिं.स.)। राज्य व केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ एकल महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सदैव तत्पर असून त्यांना आवश्यक त्या सुविधा आणि योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन सोनपेठ नगर परिषदेचे गटनेते हाजी सद्दाम हुसेन यांनी केले.
सोनपेठ नगर परिषदेच्या वतीने आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक अक्षय कदम, शुभम कदम, जनसेवक जनार्दन झिरपे, नगरसेविका कुशावर्ताबाई झिरपे, ज्येष्ठ पत्रकार शिवमल्हार वाघे, कार्यालय अधीक्षक एम. एम. खान, संपादक किरण स्वामी, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पाटील, हनुमान कांबळे, आयुष्मान भारत जिल्हाप्रमुख आरोग्यमित्र संदीप भोसले, शाम मस्के आदी उपस्थित होते.
हाजी सद्दाम हुसेन यांनी पुढे बोलताना शहरातील एकल महिलांना कोणतीही अडचण अथवा मदतीची आवश्यकता असल्यास ती त्वरित कळविण्याचे आवाहन केले. नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्यासह नगर परिषदेचे सर्व नगरसेवक नागरिकांच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यालय अधीक्षक एम. एम. खान यांनी एकल महिलांसाठी लवकरच विशेष आरोग्य शिबिर तसेच आयुष्मान भारत कार्ड वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार शिवमल्हार वाघे तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक व तहसील कार्यालयातील संबंधित विभागांच्या अधिकार्यांनी विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis