
अमरावती, 23 जून (हिं.स.) | पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद या तीन यंत्रणांच्या समन्वयातून शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर कप’ स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील ४० गावांतून एकूण ४८ शेतकरी गट सज्ज झाले आहेत. या गटांच्या माध्यमातून एकात्मिक पीक व्यवस्थापनाच्या सर्व बाबी शेतकरी आपल्या शेतात राबवत आहेत. गटांच्या माध्यमातून सामूहिक स्वरूपात बियाणे, खते, बीज प्रक्रियेसाठी कीटकनाशके व बुरशीनाशके खरेदी करून खर्चात बचत केली आहे. सर्व गटांतील सदस्य समन्वयाने आपल्या शेतात आवश्यक बाबी कमी खर्चात राबवत आहेत.
गटागटांमध्ये चर्चा होते. चर्चेतून प्रश्न सुटतात. टप्प्याटप्प्यावर शास्त्रज्ञ व कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. त्या सल्ल्याप्रमाणे शेतात उपाय राबवले जातात. त्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळते. प्रत्येक टप्प्यावर खर्चात बचत होते. प्रत्येक गटाने शेतातील माती तपासणी करून घेतली आहे. जमिनीनुसार सोयाबीन, तूर आणि कपाशी पिकांच्या वाणांची निवड केली आहे. सोयाबीन, कपाशी, तूर पेरण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेतली आहे. सोयाबीन व तुरीला बीज प्रक्रिया करून घेतली आहे. बियाणे पेरणीसाठी तयार करून ठेवले आहे.
सेंद्रिय खते, शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत गटाने तयार केले आहे. काही ठिकाणी गावातून खरेदी केले आहे. शेतीचे उत्पादन कसे वाढेल, यासाठी सर्व गट प्रयत्नशील आहेत. दर आठवड्याला या शेतकरी गटांना पाणी फाउंडेशनचे जयकुमार सोनुले व रेणुका पोहोकार मार्गदर्शन करतात. तसेच कृषी विभागाचे मेंटर अमोल चौकडे आणि उमेदच्या मेंटर मोनिका मुनघाटे हे देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. अशाप्रकारे उत्पादनवाढीसाठी सूत्रबद्ध नियोजन गटांनी केलेले दिसून येते. शेतकरी गट आता फक्त पावसाची वाट पाहत आहेत. पेरणीसाठी सर्व गट सज्ज झाले आहेत. या गटशेतीचा निश्चितच चांगला परिणाम शेतीमध्ये दिसून येईल. गटागटांमध्ये चांगली चर्चा होईल. गावातील शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण होईल. चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांची वाटचाल त्या दिशेने सुरू आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी