
बीड, 23 जून (हिं.स.) : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या ओळखपत्र वितरण प्रक्रियेला गती देऊन नोंदणी तातडीने व अचूकपणे पूर्ण करावी, असे निर्देश समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान आणि समाज कल्याण सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांची प्रमुख उपस्थिती होती. तर सर्व तहसीलदार व गट विकास अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते. ऊसतोड कामगारांना अधिकृत ओळखपत्र देण्यासाठी गावपातळीवर विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती अचूक यादी तयार करून मंजुरीसाठी सहायक गट विकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करेल. महाराष्ट्र राज्यासाठी स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या संस्थेच्या माध्यमातून हे आधुनिक सर्वेक्षण केले जाणार आहे.जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची संख्या मोठी असल्याने लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ, पुणेच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis