रायगड-वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप; दहा दिवसांत ४२ लाखांचा दंड
रायगड, 23 जून (हिं.स.) : रायगड जिल्ह्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात जिल्हा वाहतूक शाखेने मोठी मोहीम राबवत गेल्या दहा दिवसांत ४ हजार २७ चालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईतून तब्बल ४२ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्या
Crackdown on traffic rule violators; ₹42 lakh in fines collected in ten days.


रायगड, 23 जून (हिं.स.) : रायगड जिल्ह्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात जिल्हा वाहतूक शाखेने मोठी मोहीम राबवत गेल्या दहा दिवसांत ४ हजार २७ चालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईतून तब्बल ४२ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यात वाढते पर्यटन, औद्योगिकीकरण आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे रस्त्यांवरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः दुचाकी वाहनांची वार्षिक नोंदणी २५ हजारांहून अधिक होत असल्याने वाहतुकीवरील ताण वाढत आहे. मात्र, अनेक चालकांकडून हेल्मेट न वापरणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, ट्रिपल सीट प्रवास करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे आदी नियमभंग सातत्याने होत असल्याचे दिसून येत आहे.

अशा नियमभंगामुळे अपघातांची संख्या वाढत असून अनेकांना गंभीर दुखापतींसह कायमचे अपंगत्व येते, तर काहींना जीव गमवावा लागतो. हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांच्या अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने वाहतूक शाखेकडून शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहीमही राबवली जात आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, प्रमुख चौक आणि नाक्यांवर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून नियमित तपासणी केली जात आहे. या मोहिमेदरम्यान १६ जून रोजी सर्वाधिक ५३१ चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ५ लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच १३ आणि १४ जून रोजी अनुक्रमे ४०३ व ४७९ चालकांवर कारवाई करण्यात आली.

दररोज २ ते ५ लाख रुपयांपर्यंत दंड वसूल होत असल्याने वाहतूक नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होत असल्याचे दिसून येत आहे. बेशिस्त वाहनचालकांविरोधातील ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande