दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षपदी विलास गजघाटे
- भदंत सुरेई ससाई यांनी पदावरून हटवण्यात आले नागपूर, 23 जून (हिं.स.) : नागपूरच्या दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या नेतृत्वावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. समितीचे विद्यमान अध्यक्ष तथा धम्मसेनापती भंते सुरेई ससाई यांना पदाव
दीक्षाभूमी लोगो


- भदंत सुरेई ससाई यांनी पदावरून हटवण्यात आले

नागपूर, 23 जून (हिं.स.) : नागपूरच्या दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या नेतृत्वावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. समितीचे विद्यमान अध्यक्ष तथा धम्मसेनापती भंते सुरेई ससाई यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी विश्वस्त विलास गजघाटे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हा निर्णय बहुमताने झाल्याचा दावा समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी पत्रकार परिषदेत केला.

डॉ. गवई यांनी सांगितले की, समितीतील ११ पैकी ८ सदस्यांच्या उपस्थितीत २२ जून रोजी दीक्षाभूमी येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत एकमताने विलास गजघाटे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. धर्मादाय उपायुक्तांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया कायदेशीररीत्या पार पाडण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे आरोप केला की, भंते सुरेई ससाई हे समितीचे कामकाज एकतर्फी पद्धतीने चालवत होते आणि धनादेशांवर केवळ स्वतःचीच स्वाक्षरी करत होते. त्यामुळे नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला, असे गवई यांनी सांगितले. मात्र, पुढील चोवीस तासांत भंतेंनी सर्व सदस्यांसोबत चर्चा करून बहुमताच्या अटी मान्य केल्यास त्यांना पुन्हा अध्यक्षपदी ठेवण्याचा विचार होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भदंत सुरेई ससाई यांनी ही बैठकच असंवैधानिक असल्याचा दावा करत निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी सचिव डॉ. राजेंद्र गवई यांच्या नियुक्तीवरही आक्षेप घेतला असून, काही सदस्यांची नोंद धर्मादाय आयुक्तालयात अद्याप नसल्याचेही त्यांनी नमूद केले. यासंदर्भात पोलिस आयुक्तालयात तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणामुळे दीक्षाभूमी स्मारक समितीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande