लातूर तालुक्यात नवीन अपर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी; प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध
मुरुड बु. येथे मुख्यालय, ३ महसूल मंडळे व ४३ गावांचा समावेश लातूर, २३ जून (हिं.स.) : लातूर तालुक्यात नवीन अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास शासनाची मंजुरी मिळाली असून त्याचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करणारी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्
लातूर तालुक्यात नवीन अपर तहसीलदार कार्यालयाला मंजुरी; प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध


मुरुड बु. येथे मुख्यालय, ३ महसूल मंडळे व ४३ गावांचा समावेश

लातूर, २३ जून (हिं.स.) : लातूर तालुक्यात नवीन अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास शासनाची मंजुरी मिळाली असून त्याचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करणारी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी रोहिणी नरहे-विरोळे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत ही अधिसूचना जारी केली आहे.

अधिसूचनेनुसार, मुरुड बु. येथील अपर तहसीलदार कार्यालयाकडे लातूर तहसीलदारांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ तसेच त्या-त्या वेळी लागू असलेल्या कायद्यांन्वये प्राप्त असलेले अधिकार आणि कर्तव्ये संबंधित कार्यक्षेत्रापुरती प्रत्यार्पित करण्यात येणार आहेत.

नवीन अपर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय मुरुड बु. येथील ग्रामपंचायत इमारत किंवा ग्रामसेवक क्वार्टर येथे कार्यरत राहणार आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मुरुड बु., चिंचोली (ब.) आणि तांदुळजा या तीन महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. या मंडळांअंतर्गत येणारे एकूण १८ साझे तसेच ४३ गावे, वाड्या आणि तांडे या कार्यालयाच्या अखत्यारीत असतील.

या प्रशासकीय पुनर्रचनेमुळे संबंधित क्षेत्रातील महसूलविषयक कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होणार असून नागरिकांना स्थानिक स्तरावर अधिक सुलभ सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रारूप अधिसूचनेबाबत नागरिकांना काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या ७ जुलै २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत उपविभागीय अधिकारी कार्यालय, मेन रोड, तहसील कार्यालयासमोर, लातूर येथे समक्ष सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून पुढील कार्यवाहीसाठी त्या शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या जातील, असे उपविभागीय अधिकारी रोहिणी नरहे-विरोळे यांनी म्हटले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande