
अमरावती, 23 जून (हिं.स.) : तिवसा येथे महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लालबावटा) यांच्या तिवसा तालुका शाखेने सोमवारी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. ग्राहकांकडून सध्याच्या मीटरबाबत कोणतीही तक्रार नसताना, केवळ अदानी कंपनीच्या फायद्यासाठी जुने मीटर बदलून सक्तीने स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
या नवीन स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात थेट १०० ते २०० टक्क्यांची वाढ होत आहे. यामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी व शेतमजूर पूर्णपणे कोलमडला आहे. आंदोलकांनी म्हटले की, वीज ही मानवी जीवनाची मूलभूत गरज असताना, वीज कंपन्या आणि सरकार युनिट दर १५ पैशांवरून थेट १५ रुपयांपर्यंत वाढवून ग्राहकांची पिळवणूक करत आहेत.या धोरणाचा निषेध करत आंदोलकांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांची भेट घेतली. त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनामध्ये स्मार्ट मीटरची सक्ती बंद करणे, शंका असल्यास सध्याच्या मीटरची तांत्रिक तपासणी करणे, पंजाब आणि तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर स्मार्ट मीटर न बसवण्याचा अधिकृत निर्णय घेणे, वीज दरवाढ मागे घेणे, २४ तास वीज पुरवठा करून कृषी पंपांसाठी सोलरची सक्ती मागे घेऊन शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवणे, तसेच निवडणुकीत एन.डी.ए.ने घोषणा केल्याप्रमाणे २०० युनिट वीज मोफत देण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी करणे या मागण्यांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी