अहेरीच्या आदिवासी बालकलावंतांची दिल्लीत ऐतिहासिक झेप
‘हाताऊ आबा-आबा’ने राष्ट्रीय रंगमंच गाजवला गडचिरोली, 23 जून (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील बालकलावंतांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर देशाच्या राजधानीतील राष्ट्रीय रंगमंच गाठत ऐतिहासिक कामगिरीची नोंद
दिल्ली येथे नाट्य सादर करतांना बाल कलाकार


‘हाताऊ आबा-आबा’ने राष्ट्रीय रंगमंच गाजवला

गडचिरोली, 23 जून (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील बालकलावंतांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर देशाच्या राजधानीतील राष्ट्रीय रंगमंच गाठत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD), इंडियन ऑईल आणि आदिग्राम (आदिवासी ग्रामीण साहित्य बहुउद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ, चंद्रपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रंग पल्लव महोत्सव 2026’ अंतर्गत 21 जून रोजी नवी दिल्ली येथील NSDच्या राष्ट्रीय अभिमंच सभागृहात ‘हाताऊ आबा-आबा’ या बालनाट्याचा प्रभावी प्रयोग सादर करण्यात आला.

या राष्ट्रीय महोत्सवात महाराष्ट्रासह देशातील सात राज्यांतील बालनाट्य संघांनी सहभाग घेतला होता. अशा प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातील अहेरी तालुक्याला मिळणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

‘हाताऊ आबा-आबा’ म्हणजे निसर्गाची सर्वोच्च शक्ती. या संकल्पनेवर आधारित नाटकातून जंगल, पर्यावरण आणि निसर्गाशी एकरूप होऊन जीवन जगणाऱ्या मूलनिवासी आदिवासी समाजाचे वास्तव चित्रण करण्यात आले आहे. आदिवासी संस्कृती, निसर्गाशी असलेले अतूट नाते आणि आधुनिक विकासाच्या प्रक्रियेत त्यांच्या अस्तित्वासाठी सुरू असलेला संघर्ष या नाटकातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला.

या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन प्रख्यात रंगकर्मी अखिलेश खन्ना यांनी केले असून, सहदिग्दर्शिका म्हणून NSDच्या खुशबू कुमारी यांनी योगदान दिले आहे. युवा रंगकर्मी राहुल पेंढारकर यांनी संगीत संयोजन केले असून, सुहास नगराळे यांनी नाट्य शिबिराला विशेष सहकार्य केले.

आदिग्रामचे उल्लेखनीय योगदान

आदिवासी ग्रामीण साहित्य बहुउद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ (आदिग्राम) ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी, ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या पुढाकारातून इंडियन ऑईल आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासारख्या राष्ट्रीय संस्थांशी समन्वय साधत ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील कलावंत म्हणून घडविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

याबाबत माहिती देताना राहुल पेंढारकर म्हणाले की, आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. भविष्यातही विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्यात येईल.

‘हाताऊ आबा-आबा’चा जन्म कसा झाला ?

सहदिग्दर्शिका खुशबू कुमारी यांनी सांगितले की, “गडचिरोलीच्या घनदाट जंगलातून प्रवास करताना आणि अहेरीतील आदिवासी मुलांना भेटल्यानंतर आलेल्या अनुभवांना नाट्यरूप मिळाले. कार्यशाळेदरम्यान मुलांसोबत केलेल्या उत्स्फूर्त प्रयोगांतून जंगल, वन्यजीव, आदिवासी संस्कृती आणि निसर्गाच्या सर्वोच्च शक्तीची संकल्पना आकाराला आली. राहुल पेंढारकर यांच्या सहकार्यामुळे ‘हाताऊ आबा-आबा’ या नाटकाचा जन्म झाला. आज हे नाटक दिल्लीच्या राष्ट्रीय रंगमंचावर पोहोचल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही.”

‘रानपाखरांच्या’ यशाचे सर्वत्र कौतुक

दिग्दर्शक अखिलेश खन्ना यांनी सांगितले की, अहेरीच्या जंगलात रुजलेले स्वप्न दिल्लीच्या राष्ट्रीय रंगमंचावर फुलले आहे. ‘हाताऊ आबा-आबा’ हा केवळ नाट्यप्रयोग नसून आदिवासी अस्मिता, निसर्ग आणि संघर्षाची जिवंत कहाणी आहे. एनएसडीने या बालकलावंतांना प्रशिक्षण देऊन नाटकाचा पाया रचला आहे. आता हा नाट्यप्रवास अधिक व्यापक करण्याची जबाबदारी स्थानिक सांस्कृतिक संस्थांची आहे. या रानपाखरांना आणखी उंच भरारी घेण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.

स्थानिक सांस्कृतिक संस्थांना सीएसआर निधीची गरज

यावेळी राहुल पेंढारकर यांनी स्थानिक आदिवासी सांस्कृतिक संस्थांच्या उपेक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, इंडियन ऑईलसारखी बाहेरील संस्था गडचिरोलीतील दुर्गम भागांमध्ये सांस्कृतिक विकासासाठी निधी उपलब्ध करून देते. मात्र जिल्ह्यातून मोठा महसूल मिळवणाऱ्या कंपन्यांनीही स्थानिक आदिवासी नाट्य व सांस्कृतिक संस्थांना सीएसआर निधीद्वारे पाठबळ देण्याची गरज आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

दिल्लीच्या राष्ट्रीय रंगमंचावर ‘हाताऊ आबा-आबा’च्या यशस्वी सादरीकरणामुळे अहेरीच्या आदिवासी बालकलावंतांनी आपल्या कलेची मोहोर उमटवत गडचिरोलीसह संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande