
लातूर, 23 जून (हिं.स.) : लातूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील घंटागाडीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. कर्तव्य बजावत असताना कचऱ्यामध्ये सापडलेली सुमारे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी संबंधित नागरिकाला परत करून त्यांनी माणुसकी आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श समाजासमोर ठेवला.
घंटागाडी कर्मचारी दिनकर भिवाजी मस्के आणि संभाजी उपाडे यांना कचरा संकलनादरम्यान ही अंगठी आढळून आली. त्यांनी कोणताही मोह न बाळगता संबंधित नागरिकांचा शोध घेऊन अंगठी प्रामाणिकपणे परत केली.त्यांच्या या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत स्थायी समितीचे सभापती सचिन बंडापल्ली यांच्या हस्ते दिनकर भिवाजी मस्के यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्यात आले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
----------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis