
- काळाराम मंदिर ते कालिका मंदिरपर्यंत क्रीडा ज्योत रॅली
- आगामी ३० जूनपर्यंत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
नाशिक, २३ जून (हिं.स.) : जागतिक ऑलिंपिक दिनानिमित्त नाशिकमध्ये सोमवारी भव्य क्रीडा रॅलीचे आयोजन करण्यात आले. गेल्या १७ वर्षांपासून कालिका मंदिर संस्थान, यशवंत व्यायाम शाळा, क्रीडा संस्कृती फाउंडेशन आणि डी.एस.एफ. यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम उत्साहात साजरा केला जात आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिर ते कालिका मंदिर संस्थान दरम्यान क्रीडा रॅली काढण्यात आली. काळाराम मंदिर येथून १६७ खेळाडूंच्या उपस्थितीत ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ तसेच क्रीडा मंत्र्यांचे माजी ओएसडी व माजी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
यावेळी रवींद्र नाईक आणि दत्तू भोकनळ यांनी उपस्थित खेळाडूंना ऑलिंपिक दिनाचे महत्त्व पटवून दिले. नाशिकमधून भविष्यात अधिकाधिक ऑलिम्पियन खेळाडू घडावेत, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
या रॅलीत प्रमुख क्रीडा संघटक अशोक दुधारे, आनंद खरे, राजू शिंदे, उदय खरे, अविनाश ढोली, मॉडर्न पेंथॉथलॉन फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे, तांत्रिक समितीचे अध्यक्ष निहार शहा, दीपक निकम, चिन्मय देशपांडे, अश्वमेध अकादमीचे संचालक मनीष बोरस्ते, कबड्डी प्रशिक्षक शरद पाटील, नवजीवन स्कूलचे भूषण सोननिस, तन्मय कर्णिक आणि कुणाल अहिरे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
काळाराम मंदिर, पंचवटी कारंजा, अहिल्याबाई होळकर पूल, रविवार कारंजा, टिळक रोड, यशवंत व्यायाम शाळा, मेहेर सिग्नल, सीबीएस मोडक सर्कल, गडकरी चौक मार्गे कालिका मंदिरापर्यंत ही रॅली पार पडली. कालिका मंदिर येथे संस्थानचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील आणि यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी रॅलीचे स्वागत करून खेळाडूंना मार्गदर्शन केले. तसेच सहभागी खेळाडूंना अल्पोपहाराचेही वितरण करण्यात आले.
दरम्यान, या उपक्रमांतर्गत २३ ते ३० जून दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तलवारबाजी, कॅरम, फूटसाल, सेपक टकरा, जंप रोप, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल या खेळांचा त्यामध्ये समावेश आहे. तसेच २६ जून रोजी पेठ रोडवरील चामर लेणी परिसरात बीज उधळण व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ ३० जून रोजी कालिका मंदिर संस्थानच्या सभागृहात होणार असल्याची माहिती अशोक दुधारे यांनी दिली. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी पोलिस विभाग आणि वाहतूक पोलिसांचे विशेष सहकार्य लाभल्याने संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले.-------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV