
बीड, 23 जून, (हिं.स.)। अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या ‘हॅपी स्कूल’ संकल्पने अंतर्गत ई-लर्निंग सॉफ्टवेअरसह डिजिटल स्मार्ट बोर्डचे लोकार्पण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे, या उदात्त उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या कार्यक्रमास रोटरीच्या अध्यक्षा रोहिणी पाठक, संतोष मोहिते, कल्याण काळे, राधेश्याम लोहिया, प्रा. अजय पाठक, मुख्याध्यापक राजेसाहेब किर्दंत आणि घोरपडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोहिणी पाठक यांनी रोटरीच्या आगामी योजनांची माहिती दिली. पहिल्या टप्प्यात शाळेला स्मार्ट बोर्ड देण्यात आला असून, पुढील टप्प्यात गरजू विद्यार्थिनींसाठी ५ सायकली, हँडवॉश स्टेशन, लायब्ररीसाठी कपाटे आणि कंपोस्टिंग बॅरल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पट्टीवडगावच्या शाळेला सर्व सोयी-सुविधांनी युक्त असे आदर्श ‘हॅपी स्कूल’ बनविण्याचा रोटरीचा संकल्प आहे. दृक-श्राव्य माध्यमातून शिकविल्या जाणाऱ्या संकल्पना विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे समजतात, तसेच आधुनिक तंत्रज्ञानामुळे शिक्षण अधिक आनंददायी व सुलभ होते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अशा आधुनिक सोयी-सुविधा अत्यंत गरजेच्या असून विद्यार्थ्यांनी या सुविधेचा योग्य वापर करून आपले भविष्य उज्ज्वल करावे आणि 'स्मार्ट विद्यार्थी' बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis