सोलापुरात शेतजमिनीच्या वादातून तलवारीने हत्या
सोलापूर, 23 जून (हिं.स.)। कामती खुर्द परिसरात शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच भावाची तलवारीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
grdf


सोलापूर, 23 जून (हिं.स.)। कामती खुर्द परिसरात शेतजमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच भावाची तलवारीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संजय शिंदे यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृत शेतकऱ्याचे नाव संजय नागनाथ शिंदे असे असून, त्यांचा त्यांच्या भावांशी शेतजमिनीच्या वाटणीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे दुचाकीवरून शेताकडे जात असताना आरोपींनी त्यांना अडवून हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यादरम्यान वादाचे रूपांतर तुफान झटापटीत झाले. या वेळी आरोपींनी सोबत आणलेल्या धारदार तलवारीने संजय शिंदे यांच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, मृताच्या मुलाने ही घटना पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोप केला आहे. जमिनीच्या वादातूनच सख्ख्या भावांनी आणि पुतण्यांनी संगनमत करून हल्ला केल्याचा दावा त्यांनी केला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. भावकीतील वादातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे कामती खुर्द परिसर हादरला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande