
नाशिक, 23 जून (हिं.स.)। ट्रिपल तलाकच्या घटनांमुळे मुस्लिम महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे सांगत आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. पाकिस्तानात बहुविवाह पध्दतीचे प्रमाण अवघा एक टक्का असतांना आपल्याकडे मात्र या कायद्याचा गैरवापर केला जात असल्याचा मुददा त्यांनी पुराव्यानिधी सभागृहात मांडला. या मुद्द्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ट्रिपल तलाक कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसह महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले.
फरांदे यांनी सभागृहात सांगितले की, गेल्या दीड महिन्यात नाशिकमधील तीन मुस्लिम महिलांनी माझयाकडे मदतीसाठी धाव घेतली. एका प्रकरणात महिलेवर पतीकडून जबरदस्तीने तलाक देण्यासाठी दबाव आणण्यात आला. तिने नकार दिल्यानंतर ‘हलाला’ करण्याची तसेच नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. दुसर्या प्रकरणात पतीने पत्नीच्या मानेवर चाकू ठेवून धमकावले, तर तिसर्या प्रकरणात महिलेला वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व महिला बुरखाधारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.मुस्लिम समाजातील बहुविवाहाच्या प्रथेचाही उल्लेख करत फरांदे म्हणाल्या की, पाकिस्तानमध्ये दुसरे लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीची लेखी संमती आवश्यक असून ‘अरबिटरी कौन्सिल’ची परवानगीही घ्यावी लागते. त्यामुळे तेथे बहुविवाहाचे प्रमाण केवळ एक टक्का आहे.
भारतात मात्र अशा प्रकारची कोणतीही बंधने नाहीत, असे त्यांनी सांगितले.यासंदर्भात कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करणार का, उत्तराखंड व गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करणार का आणि बहुविवाहामुळे मुलांच्या संगोपनाची जबाबदारी कोण घेणार, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आमदार सना मलिक यांनीही फरांदे यांनी मांडलेल्या मुद्द्यांना समर्थन दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV