
अमरावती, 23 जून (हिं.स.) : अमरावती शहरात अवैधरीत्या घातक शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध अमरावती शहर पोलिसांनी तीव्र मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, एका २१ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध देशी कट्टा (पिस्तूल) आणि ६ जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शस्त्र पुरवणाऱ्या मुख्य आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
पवन उर्फ क्षितीज सुनील लोणारे (२१, रा. चपराशीपुरा, अमरावती) असे देशी कट्ट्यासह पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वाखालील पथक शहरात गस्त घालत होते. त्याचवेळी गुप्त बातमीदाराकडून त्यांना माहिती मिळाली की, पवन उर्फ क्षितीज लोणारे हा स्वतःजवळ देशी बनावटीचा कट्टा बाळगून फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डेंटल कॉलेजकडून वडाळी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोपेडसह उभा आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पवन लोणारे याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्याच्या मोपेडच्या डिक्कीची तपासणी केली. यावेळी पोलिसांना डिक्कीमध्ये एक देशी कट्टा आणि ६ जिवंत काडतूस मिळून आले. पोलिसांनी हे घातक अग्नीशस्त्र आणि काडतुसे जप्त केली.पवन लोणारेविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात आर्म्स ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत गुन्हे शाखेने एकूण १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ३५ हजार रुपयांचा एक देशी कट्टा, ६ हजारांचे ६ जिवंत काडतूस (राऊंड), मोबाईल, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे व पीआय अतुल वर यांच्या नेतृत्वात एपीआय महेश इंगोले, पीएसआय गजानन सोनुने यांच्यासह पथकाने केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी