
रायगड, 23 जून, (हिं.स.) - रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टेट) २०२६ रविवार, दि. २८ जून रोजी पार पडणार असून जिल्ह्यातील ९ परीक्षा केंद्रांवर एकूण १० हजार २०३ उमेदवार परीक्षा देणार आहेत. यामध्ये पेपर-१ साठी ४ हजार ४३२ तर पेपर-२ साठी ५ हजार ७७१ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अत्याधुनिक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवण्यात येणार असून बायोमेट्रिक पडताळणी, फेस रेकग्निशन प्रणाली, हँड हेल्ड मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित निरीक्षण यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर येताना आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मूळ फोटो ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर आणि इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
पेपर-१ साठी उमेदवारांनी सकाळी ८.३० वाजेपर्यंत, तर पेपर-२ साठी दुपारी १२.३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रश्नपत्रिकांवर युनिक नंबर आणि क्यूआर कोडचा वापर करण्यात येणार असून उत्तरपत्रिकांसोबत कार्बन प्रतही देण्यात येणार आहे.
दिव्यांग उमेदवारांसाठी लेखनिकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती व सूचना उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच घ्याव्यात आणि कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)