
अमरावती, 23 जून (हिं.स.) | लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या अमरावती महानगरपालिकेतील सहायक पशुशल्य चिकित्सक डॉ. सचिन छगनअप्पा बोन्द्रे यांना आयुक्त वर्षा लड्डा यांनी तात्काळ प्रभावाने निलंबित केले.
या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ८ जून रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती तक्रारीच्या पडताळणीत तक्रारदाराच्या संस्थेने अमरावती महानगरपालिके अंतर्गत श्वान उत्पत्ती नियंत्रण, निर्बीजीकरण व लसीकरण कार्यक्रमाचे कंत्राट पूर्ण केल्यानंतर सुमारे ४७ लाख रुपयांची देयके मंजूर करून देण्यासाठी बोन्द्रे यांनी २५ लाखांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान सुरुवातीला दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तडजोडीअंती एक लाख रुपयांची लाच स्वीकारण्याचे ठरल्याचे एसीबीच्या चौकशीत समोर आले.
या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०२६३/२०२६ नोंदविण्यात आला असून १७ जून रोजी दुपारी त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३(१) चे उल्लंघन झाल्याचे नमूद करत महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ४(२) अन्वये आयुक्त वर्षा लड्डा यांनी त्यांचे निलंबन करण्याचे आदेश जारी केले आहेत. निलंबन काळात सचिन बोन्द्रे यांचे मुख्यालय झोन क्रमांक १ येथे राहणार आहे. या काळात त्यांनी कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय केल्यास त्यांच्यावर गैरवर्तणुकीची कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नियमानुसार त्यांना निर्वाह भत्ता व इतर अनुज्ञेय भत्ते देण्यात येणार आहेत. लाचखोरीच्या आरोपामुळे महापालिकेच्या पशुशल्य विभागात खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी