
बीड, 23 जून (हिं.स.)। केज तालुक्यातील टाकळी - कदमवाडी परिसरात विलास नवनाथ घुले या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या प्रकरणातील सर्व नऊ आरोपींना तात्काळ बेड्या ठोकून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी आज सभागृहात शासनाकडे केली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत केवळ तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, प्रत्यक्ष वार करणाऱ्या मुख्य संशयितासह उर्वरित सहा आरोपी अजूनही मोकाट आहेत. मुख्य आरोपीला अद्याप अटक न झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड संताप आणि असुरक्षिततेची भावना आहे. याबाबत आमदार मुंदडा यांनी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी फोनवरून चर्चा करून सखोल तपासाची मागणी केली.
या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आणि न्यायाच्या मागणीसाठी केज पोलीस ठाण्याबाहेर संतप्त नागरिकांचा आणि नातेवाईकांचा जनसागर उसळला आहे. जोपर्यंत सर्व नऊ आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या या प्रकरणाची शासनाने तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. कोणत्याही दडपणाशिवाय पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. या गुन्ह्यातील एकही दोषी सुटता कामा नये, आम्ही या लढ्यात आणि योग्य न्यायासाठी घुले कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे आमदार नमिता मुंदडा यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis