
अमरावती, 23 जून (हिं.स.) : रस्ते सुरक्षा आणि हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी तिवसा येथील पंचवटी चौकात आरटीओ विभाग व तिवसा पोलिस प्रशासनाच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांना थांबवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले आणि हेल्मेट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
या अभिनव उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच सुरक्षित वाहन चालविण्याचा संदेश सकारात्मक पद्धतीने पोहोचविणे हा आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणून हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनधारकांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. भविष्यात स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नियमित हेल्मेट वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
सामान्यतः वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र तिवसा येथे सकारात्मक आणि लोकाभिमुख पद्धतीने जनजागृती करण्यासाठी हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आल्याने नागरिकांमध्ये या उपक्रमाची चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेक वाहनचालकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यात हेल्मेट वापरण्याचा संकल्प व्यक्त केला.
तिवसा शहरातील पंचवटी चौकात झालेल्या या उपक्रमामुळे वाहतूक नियमांचे पालन आणि रस्ते सुरक्षेबाबत प्रभावी संदेश समाजात पोहोचला असून नागरिकांकडून आरटीओ व पोलिस प्रशासनाच्या या अभिनव जनजागृतीचे कौतुक करण्यात येत आहे.आक्रमक पोलिसांद्वारे संवाद आरटीओ व पोलिस अधिकारी एरवी नियमांवर बोट ठेऊन वाहनधारकांशी आक्रमक स्वरुपात सादर होतात. परंतु आज मात्र त्यांनी वाहनचालकांशी संवाद साधत हेल्मेटचे महत्त्व पटवून दिले. अपघाताच्या वेळी गंभीर दुखापतींपासून डोक्याचे संरक्षण करण्यासाठी हेल्मेट अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही संवादादरम्यान नमूद केले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी