रायगडमध्ये २२ दिवसांत फक्त २२.३ मिमी पाऊस; चिंतेचे ढग कायम
रायगड, 23 जून (हिं.स.)। दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर सोमवारी रायगड जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावत नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. जिल्ह्यातील बहुतांश भागांत जोरदार सरी कोसळल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गारव्याचा अनुभव मिळाला
Only 22.3 mm of rainfall in 22 days; clouds of concern persist in Raigad.


रायगड, 23 जून (हिं.स.)। दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर सोमवारी रायगड जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावत नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. जिल्ह्यातील बहुतांश भागांत जोरदार सरी कोसळल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गारव्याचा अनुभव मिळाला, तर खरीप हंगामाच्या तयारीला नवसंजीवनी मिळाली.

जिल्ह्यात सोमवारी सरासरी ११.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुकानिहाय आकडेवारीनुसार मुरूड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. त्याखालोखाल अलिबाग, पोलादपूर, महाड, उरण आणि रोहा तालुक्यांतही समाधानकारक पाऊस झाला. मात्र, पनवेल, कर्जत, पेण, सुधागड, माणगाव, श्रीवर्धन आणि म्हसळा या तालुक्यांत तुलनेने कमी पावसाची नोंद झाली.

जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच मान्सूनने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते, तर धरणे, विहिरी आणि तलावांतील जलसाठा झपाट्याने कमी होत होता. जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ १७.६७ टक्के जलसाठा शिल्लक राहिल्याने पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती.

याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. पेरणीसाठी तयारी पूर्ण असूनही पावसाअभावी भातशेतीची कामे ठप्प झाली होती. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला होता. ज्या शेतकऱ्यांनी धुळपेरणी केली होती, त्यांना भाताची रोपे जगवण्यासाठी विहिरींच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत होता.

अखेर सोमवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह पावसाने जिल्ह्यात दमदार प्रवेश केला. दिवसभर अधूनमधून झालेल्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मात्र, एका दिवसाच्या पावसाने परिस्थिती पूर्णपणे बदललेली नाही. आकडेवारीनुसार, दि. २२ जून २०२६ पर्यंत जिल्ह्यात केवळ २२.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याउलट, गतवर्षी याच कालावधीत ५२२ मि.मी. पाऊस झाला होता. म्हणजेच यंदा पावसाचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी असून तूट शंभर टक्क्यांच्या आसपास पोहोचली आहे.

त्यामुळे सोमवारी झालेल्या पावसाने दिलासा मिळाला असला, तरी खरीप हंगाम, पाणीसाठे आणि आगामी जलस्थिती यासाठी पुढील काही दिवसांत मान्सूनचा जोर कायम राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande