सभागृहात गदारोळ; विरोधकांचा सभात्याग, आदित्य ठाकरे-शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक
मुंबई, 23 जून (हिं.स.)। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या अखत्यारीतील काही विभागांची उत्तरे सभागृहात देण्यासाठी इतर मंत्र्यांकडे ज
Opposition stages walkout verbal clash between Aaditya Thackeray Shinde


मुंबई, 23 जून (हिं.स.)। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या अखत्यारीतील काही विभागांची उत्तरे सभागृहात देण्यासाठी इतर मंत्र्यांकडे जबाबदारी सोपवल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अशाच पद्धतीने आपल्या विभागांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे इतर मंत्र्यांकडून दिली जात असल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला.

विरोधी पक्षनेते जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी सरकारच्या या भूमिकेवर जोरदार टीका करत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. मंत्र्यांनी स्वतःच्या खात्यांचा अभ्यास करून प्रश्नांना उत्तरे द्यायला हवीत, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षातील सदस्यांनी अखेर सभात्याग करत कामकाजावर बहिष्कार टाकला.

सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “आज आम्ही सभागृहावर बहिष्कार टाकला. या सरकारच्या काळात एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. मंत्री स्वतःच्या खात्यांचा अभ्यास करत नाहीत. उत्तर देता येत नाही म्हणून दुसऱ्या मंत्र्यांवर जबाबदारी सोपवली जाते. काही मंत्री तरी उत्तरे देतात, पण फेकनाथ मिंधे उत्तर देण्यापासून पळ काढतात. आमच्या सरकारच्या काळात कोणत्याही मंत्र्याने जबाबदारी दुसऱ्यावर ढकलली नव्हती. जी खाती मागून घेतली, त्याबाबत उत्तर देण्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे,” असे ते म्हणाले. तसेच विधानसभा अध्यक्षांनी केलेले वक्तव्य नोंदीतून काढून टाकावे, अशी मागणीही त्यांनी केली.

याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. अध्यक्ष वारंवार अवघड इंग्रजी शब्द वापरून सदस्यांना कमी लेखत असल्याचा आरोप करत, “आम्हालाही इंग्रजी समजते. हातात अधिकार आहेत म्हणून सभागृह मनमानी पद्धतीने चालवायचे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, विरोधकांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहातच प्रत्युत्तर दिले. “काल दिलेल्या जोरदार राजकीय धक्क्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. पुढेही असे धक्के बसतील,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार यांच्याकडे पाहत, “तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, मग अशा पोराटोरांचे ऐकता कसे?” असा उपरोधिक प्रश्न उपस्थित करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. या शाब्दिक चकमकीमुळे सभागृहातील वातावरण आणखी तापले आणि अधिवेशनातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande