
नांदेड, 23 जून (हिं.स.)।किराणा दुकाने, सुपरमार्केट आणि इतर विक्री केंद्रांच्या बाहेर लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी लावण्यात येणाऱ्या चिप्स, कुरकुरे व इतर जंक फूडच्या पाकिटांच्या प्रदर्शनावर नियंत्रण आणावे, अशी मागणी एका जागरूक पालकाने अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) महाराष्ट्र राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. बहुतांश किराणा दुकाने व सुपरमार्केटच्या प्रवेशद्वारावर किंवा बाहेरील भागात विविध जंक फूडची रंगीबेरंगी पाकिटे आकर्षक पद्धतीने टांगण्यात येतात.
त्यामुळे दुकानात येणाऱ्या-जाणाऱ्या लहान मुलांचे लक्ष सहजपणे या उत्पादनांकडे वेधले जाते. परिणामी मुले पालकांकडे ही उत्पादने खरेदी करण्याचा आग्रह धरतात. प्रक्रिया केलेले व पौष्टिक मूल्य कमी असलेले असे खाद्यपदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहेत. अनेक मुले जंक फूडच्या आहारी जाऊन नियमित व संतुलित आहाराकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे लठ्ठपणा, कुपोषण, दातांचे विकार तसेच इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याचा धोका वाढत आहे. या मागणीचा उद्देश जंक फूडच्या विक्रीवर बंदी आणणे नसून, त्याच्या प्रदर्शनाबाबत नियमावली तयार करणे आहे. मुलांच्या नजरेस सहज पडेल अशा ठिकाणी ही उत्पादने ठेवण्याऐवजी दुकानाच्या आतील भागात ठेवण्याचे निर्देश द्यावेत किंवा अशा उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत, अशी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, या पत्राची दखल घेऊन अन्न व औषधी प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातात? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis