
हिंगोली, 23 जून (हिं.स.) : हिंगोली ते वाशिम रोडवरील वडद फाटा येथे काही जणांनी गाडी अडवून मारहाण करत चार हजार रुपये हिसकावून नेल्याची खोटी माहिती डायल 112 वर देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका मोबाईलधारकाने डायल 112 वर संपर्क साधून वडद फाटा परिसरात तीन ते चार व्यक्तींनी त्याची गाडी अडवून मारहाण केली तसेच जबरदस्तीने चार हजार रुपये लुटून नेल्याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
मात्र, पोलिसांनी परिसरात सखोल चौकशी केल्यानंतर अशी कोणतीही मारहाण किंवा लुटीची घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. तपासात संबंधित व्यक्तीने पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने तसेच शासकीय वेळ आणि संसाधनांचा अपव्यय करण्यासाठी जाणीवपूर्वक खोटा कॉल केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलिस अंमलदार शरद नागुलकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी भास्कर वसु (मोबाईल क्रमांकधारक) याच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis