
पुणे, 23 जून, (हिं.स.)। पुण्यातील फुरसुंगी-मंतरवाडी परिसरात असलेल्या एच. विकास स्टील कंपनीच्या कार्यालयावर सोमवारी उशिरा रात्री अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुण्यातील व्यापारी आणि व्यावसायिक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यावसायिकाला काही दिवसांपासून कथित खंडणीसाठी धमकीचे फोन येत होते. या धमक्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, कार्यालयाच्या परिसरात गोळ्यांच्या खुणा आढळून आल्या असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये आरजू बिश्नोई, शुभम लोणकर आणि टायसन बिश्नोई या नावांचा उल्लेख करत गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच अमूल चमारिया आणि सनी चमारिया यांचाही त्या पोस्टमध्ये उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या पोस्टची सत्यता आणि या घटनेमागे खरोखरच बिश्नोई गँगचा हात आहे का, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. हा प्रकार खंडणी, व्यावसायिक वाद किंवा इतर कोणत्या कारणातून घडला, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे पुण्यातील उद्योग-व्यवसाय क्षेत्रात सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु