
नागपुरात ‘RSS@100: शतकवीर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर, 23 जून (हिं.स.) : विदर्भातील पत्रकार, संशोधक आणि विद्वानांनी नागपूर, विदर्भ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर अधिक सखोल अभ्यासाची गरज आहे. हा इतिहास जतन इतिहास जतन करण्याच्या मार्गातील अपुरे दस्तऐवजीकरण हा सर्वात मोठा अडथळा आहे. त्यामुळे इतिहास जतनासाठी दस्तऐवजीकरणाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केले. नागपूरच्या प्रसेक्लब येथे आयोजित ‘RSS@100: शतकवीर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या संघाच्या शतकीय प्रवासावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी पुस्तकाचे लेखक व ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र, विनोद देशमुख, सुधीर पाठक, एस.एन. विनोद आणि प्रकाश ऐदलाबादकर उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘RSS@100: शतकवीर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक विनोद देशमुख, प्रदीप कुमार मैत्र आणि कल्याण कुमार सिन्हा यांनी अनुक्रमे मराठी, इंग्रजी आणि हिंदी असे तीन भाषांमध्ये लिहीले आहे. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना पांडे यांनी सांगितले की, पूर्वी संघप्रमुखांच्या भाषणांमध्ये धर्मांतर, कट्टरतावाद आणि बदलत्या सामाजिक वास्तवाशी संबंधित विषय वारंवार मांडले जात असत. या विषयांचा कालानुरूप झालेला विकास आणि त्याचा समाजावर झालेला परिणाम यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास होणे आवश्यक आहे. इतिहासाच्या जतनासाठी अधिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करताना त्यांनी ब्रिटिशांनी केलेल्या व्यापक अभिलेखीय दस्तऐवजीकरणाचा संदर्भ दिला. आज आपल्या हातात साधने, संस्था आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे स्वतःचा इतिहास पद्धतशीरपणे नोंदविण्यात कोणतीही अडचण असू नये. इतिहास विसरणाऱ्यांना इतिहास कधीही माफ करत नाही असे पांडे यांनी सांगितले.
संघाशी असलेल्या आपल्या वैयक्तिक नात्याविषयी बोलताना पांडे यांनी सांगितले की, त्यांचे बालपण नागपूरच्या महाल भागात, संघ मुख्यालयाजवळ गेले असून लहानपणापासूनच त्यांनी संघाचा प्रभाव अनुभवला आहे.गेल्या शतकभरात संघाने सार्वजनिक जीवनातील अनेक क्षेत्रांवर आपला ठसा उमटविला असला, तरी त्याच्या प्रवासाचे सर्वसमावेशक आणि शैक्षणिकदृष्ट्या काटेकोर दस्तऐवजीकरण मर्यादित राहिल्याचे त्यांनी निरीक्षण नोंदवले. संघाविषयी वृत्तपत्रे आणि सार्वजनिक चर्चांमध्ये मोठ्या प्रमाणावर लेखन झाले आहे. मात्र, सविस्तर आणि वस्तुनिष्ठ दस्तऐवजीकरण तुलनेने कमी आहे. बहुतांश लिखाण वैचारिक स्पेक्ट्रमच्या दोन टोकांवरून आलेले दिसते. संघाच्या दशकांतील उत्क्रांतीचा संशोधनाधारित अभ्यास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताचे माजी सरन्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या विचारांचा संदर्भ देत पांडे म्हणाले की, आपल्या इतिहासलेखनातील एक मोठी उणीव म्हणजे अनेक महत्त्वाच्या प्रादेशिक व्यक्तिमत्त्वे आणि राजवंशांचे अपुरे दस्तऐवजीकरण. रघुजी राजे भोसले आणि नागपूरच्या भोसले घराण्याचा प्रभाव बंगाल, बिहार आणि पुरीपर्यंत पोहोचला होता. तरीही त्यांना इतिहासात योग्य ते स्थान आणि लक्ष मिळाले नाही असे त्यांनी सांगितले.विदर्भाच्या समृद्ध सांस्कृतिक आणि सभ्यतागत वारशाबाबतही अशीच उपेक्षा दिसून येते, असे नमूद करत त्यांनी सांगितले की, ऋग्वेदीय काळापासून या प्रदेशाचे उल्लेख आढळतात; तरीही त्याच्या इतिहासाचे आणि वारशाचे पुरेसे दस्तऐवजीकरण झालेले नाही असे पांडे यांनी नमूद केले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar