पुण्यात ९४ वर्षांतील सर्वात कोरडा जून; रखडलेल्या मान्सूनमुळे उष्णतेचा कहर
पुणे, 23 जून, (हिं.स.)। यंदाचा जून महिना महाराष्ट्रासाठी चिंतेचा ठरत असून मान्सूनच्या संथ गतीमुळे राज्यात पावसाचा मोठा खंड पडला आहे. ८ जून रोजी दक्षिण महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल जवळपास ठप्प झाली आहे. अरबी समुद्रातील वारे
Dushkal


पुणे, 23 जून, (हिं.स.)। यंदाचा जून महिना महाराष्ट्रासाठी चिंतेचा ठरत असून मान्सूनच्या संथ गतीमुळे राज्यात पावसाचा मोठा खंड पडला आहे. ८ जून रोजी दक्षिण महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल जवळपास ठप्प झाली आहे. अरबी समुद्रातील वारे कमकुवत झाल्याने मान्सूनचा वेग मंदावला असून राज्यात सरासरीपेक्षा सुमारे ७८ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. याचा सर्वाधिक परिणाम पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रावर झाला आहे. पुण्यात जूनच्या पहिल्या २० दिवसांत एकदाही पावसाची नोंद झालेली नाही. मान्सूनपूर्व पावसानेही दडी मारल्यामुळे १९३२ नंतरचा हा सर्वात कोरडा जून ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

यापूर्वी २०१९ आणि २०२३ मध्ये मान्सूनने उशिरा हजेरी लावली होती. त्या वर्षी मान्सून २५ जूनला मुंबईत पोहोचला होता, तर २००९ मध्ये त्याचे आगमन २१ जूनला झाले होते. तसेच १९५८ मधील जूनचा पहिला पंधरवडा पश्चिम महाराष्ट्रासाठी सर्वाधिक कोरडा म्हणून नोंदवला गेला होता.

पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता वाढली असून खरीप हंगामाच्या नियोजनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील दोन दिवस हवामानात विशेष बदल अपेक्षित नसला, तरी २३ ते २५ जूनदरम्यान मान्सून पुन्हा वेग घेण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

गेल्या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून दाखल झाला होता आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. मात्र यंदा मान्सूनच्या विलंबामुळे गेल्या सहा वर्षांतील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकरीही आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande