जुन्नरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस; शेतपिके, घरांचे मोठे नुकसान
पुणे, 23 जून (हिं.स.)। जुन्नर तालुक्यातील कुमशेत परिसरात अवघ्या अर्धा तास झालेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळे शेतपिके आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे परिसरातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आणि सर्वत्र पाणीच पाणी अशी परिस्थिती न
pik


पुणे, 23 जून (हिं.स.)। जुन्नर तालुक्यातील कुमशेत परिसरात अवघ्या अर्धा तास झालेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळे शेतपिके आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे परिसरातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आणि सर्वत्र पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली. कुमशेत, ठाकरवाडी आणि पांगरीमाथा परिसराला या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले. ठाकर समाजातील कुटुंबांनी इंधनासाठी साठवून ठेवलेली लाकडेही पावसाच्या पाण्यात वाहून गेली असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या भागात टोमॅटो, मका, ऊस तसेच भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून अनेक ठिकाणी बांध फुटल्याने सुपीक माती वाहून गेली आहे. नुकतीच लागवड केलेली पिकेही या पावसामुळे बाधित झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून कृषी व महसूल विभागाने पाहणी करावी तसेच बाधित शेतकरी आणि ठाकर आदिवासी कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande