बहुपत्नीत्वाच्या मुद्द्यावर विधानसभेत गदारोळ; सना मलिक यांचे भाजपला प्रत्युत्तर
भाजपचा पलटवार- हा देश संविधानावर चालतो, कुराणवर नाही मुंबई, 23 जून (हिं.स.)। राज्य विधानसभेत मुस्लीम महिलांवरील कथित अन्याय, बहुपत्नीत्व आणि समान नागरी कायदा या मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी झाली. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मुस्लीम समाजाती
Sana Malik counters BJP


भाजपचा पलटवार- हा देश संविधानावर चालतो, कुराणवर नाही

मुंबई, 23 जून (हिं.स.)। राज्य विधानसभेत मुस्लीम महिलांवरील कथित अन्याय, बहुपत्नीत्व आणि समान नागरी कायदा या मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी झाली. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मुस्लीम समाजातील बहुपत्नीत्वाच्या प्रथेबाबत प्रश्न उपस्थित करत देशातील मुस्लीम महिलांना या प्रथेमुळे अन्याय सहन करावा लागत असल्याचा दावा केला. तसेच पाकिस्तानमध्ये बहुविवाहाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचा उल्लेख करत, मुस्लीम महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि अधिकारांसाठी राज्य सरकार समान नागरी कायदा आणणार का, तसेच यासाठी विशेष कार्यबल स्थापन करणार का, असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर देत भाजपच्या भूमिकेवर टीका केली. मुस्लीम महिलांवर होणारे अत्याचार केवळ मुस्लीम समाजापुरते मर्यादित नसून इतर समाजांमध्येही विविध प्रकारचे अन्याय होत असल्याचे त्यांनी सांगितले. बहुपत्नीत्वाला इस्लाम धर्मात मान्यता असल्याचे नमूद करत त्यांनी पाकिस्तानने काही नवीन केले नसून कुराणात सांगितलेल्या तत्त्वांची अंमलबजावणी केली असल्याचे म्हटले. भारतातही धार्मिक स्वातंत्र्याच्या चौकटीत कुराणातील तत्त्वांचा आदर केला जावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर बोलताना सना मलिक यांनी तलाकच्या विविध पद्धतींचा उल्लेख केला. तलाक-ए-अहसन आणि तलाक-ए-हसन या पद्धती इस्लामी परंपरेचा भाग असल्याचे सांगत त्यांनी तलाक-ए-बिद्दत अर्थात तात्काळ तिहेरी तलाक ही वेगळी प्रथा असून तिचा धर्मग्रंथात कुठेही उल्लेख नसल्याचा दावा केला. भारतात तिहेरी तलाकविरोधी कायदा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या गोष्टीवर कायदा करण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली. जर अशा प्रकारचा गैरवापर होत असता तर त्याविरोधात आम्ही स्वतः आवाज उठवला असता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बहुपत्नीत्वाचा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी हा प्रकार केवळ मुस्लीम समाजातच आहे का, असा सवाल उपस्थित केला. इतर धर्मांमध्येही एकापेक्षा अधिक विवाहांची उदाहरणे आढळतात, मात्र मुस्लीम धर्मात त्यासंदर्भात स्पष्ट कायदेशीर तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले.

सना मलिक यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांच्या विधानांना तीव्र विरोध केला. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी हा देश संविधानावर चालतो, कुराणावर नाही, असे ठामपणे सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदार सना मलिक यांच्या समर्थनार्थ उभे राहिल्याने सत्ताधारी महायुतीतील मतभेदही उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande