
हिंगोली, 23 जून (हिं.स.) : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बु. येथे 2024-25 मधील अतिवृष्टी आणि कयाधू नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आला आहे. पात्र शेतकऱ्यांना यादीतून वगळून अपात्र व्यक्तींचा समावेश करण्यात आल्याचा दावा करत दोषींवर कारवाई करून पात्र लाभार्थ्यांची पुनर्निवड करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
माहितीनुसार, अतिवृष्टीनंतर महसूल व कृषी विभागाच्या वतीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा यादी तयार करण्यात आली होती. मात्र, पूरबाधित क्षेत्रात जमीन नसलेल्या तसेच काही भूमिहीन आणि अपात्र व्यक्तींना लाभार्थी यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
याशिवाय, काही शेतकऱ्यांचे क्षेत्रफळ कमी असतानाही त्यांना अधिक अनुदान मंजूर करून शासकीय निधीचा गैरवापर करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. दुसरीकडे, कयाधू नदीकाठच्या प्रत्यक्ष पूरबाधित आणि पात्र शेतकऱ्यांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींवर तात्काळ कारवाई करावी तसेच खऱ्या अर्थाने नुकसानग्रस्त आणि पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर पिंपरी बु. येथील ज्ञानेश्वर जाधव, दिलीप जाधव, विलास जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असून, प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis