
अमरावती, 23 जून (हिं.स.) : पीक विमा योजनेतून नांदगाव तालुका वगळल्याच्या निषेधार्थ शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन केले. यावेळी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना सुमारे एक तास घेराव घालत सरसकट पीक विमा मंजूर करण्याची तसेच कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली.
न.पं. गटनेते प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. शासनाने पीक विमा योजनेसाठी पात्र तालुक्यांची यादी जाहीर केली असताना नांदगाव तालुका पात्र असूनही त्याचा समावेश करण्यात आला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
यावेळी तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांना याबाबत जाब विचारण्यात आला. प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगांनुसार उत्पन्न उंबरठ्यापेक्षा कमी असतानाही उपग्रह (सॅटेलाइट) सर्वेक्षणाच्या आधारे उत्पन्न वाढल्याचे गृहीत धरून विमा कंपनीने नांदगाव तालुक्याचा पीक विमा योजनेत समावेश केला नसल्याची माहिती त्यांनी दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
दरम्यान, शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत घालण्यात आलेल्या अटींमुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोपही करण्यात आला. सन 2014 ते 2026 या कालावधीतील चार लाख रुपयांपर्यंतची थकीत कर्जे कोणत्याही अटी-शर्तींशिवाय माफ करावीत, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
मोर्चादरम्यान मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. यावेळी विष्णू तिरमारे, विलास पाटील सावदे, प्रमोद ठाकरे, डॉ. अरुण बेलसरे, मधुकर कोठाडे, दिलीप देवतळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
सात दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
राज्य विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना शासनाने कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून नांदगाव तालुक्याचा पीक विमा योजनेत समावेश करावा, अन्यथा सात दिवसांनंतर तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा न.पं. गटनेते प्रकाश मारोटकर यांनी दिला आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी