
रायगड, 23 जून (हिं.स.)। महाड शहरातील नवीपेठ परिसरात पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी भारतीय डाक विभागाने जागा उपलब्ध करून देण्यास इच्छुक असलेल्या मालकांकडून अर्ज मागविले आहेत. यासाठी महाड शहरात साधारण ३०० ते ५५० चौ. फूट क्षेत्रफळाची जागा आवश्यक असून इच्छुकांनी भाड्याच्या अपेक्षित रकमेचा उल्लेख करून आपले लेखी अर्ज सादर करावेत, असे आवाहन डाक अधीक्षक, रायगड मंडल, अलिबाग यांनी केले आहे.
भारतीय डाक विभागाकडून पोस्ट ऑफिससाठी आवश्यक असलेल्या जागेबाबत काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. जागा ३०० ते ५५० स्क्वेअर फूट क्षेत्रफळाची, प्रशस्त आणि सुव्यवस्थित असणे आवश्यक आहे. तसेच पोस्ट खात्याच्या सूचनेनुसार आवश्यक त्या सुधारणा व दुरुस्त्या जागामालकाला स्वतःच्या खर्चाने करून घ्याव्या लागतील. या कामांसाठी विभागाकडून कोणत्याही प्रकारची आगाऊ रक्कम (अॅडव्हान्स) देण्यात येणार नाही.
याशिवाय संबंधित इमारतीमध्ये स्वतंत्र वीजमीटर, पाणीपुरवठा, संडास-बाथरूम तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध असणे बंधनकारक आहे. निवड झालेल्या जागेसाठी घरमालकाला पाच वर्षांच्या कालावधीचा करारनामा स्वतःच्या खर्चाने करून घ्यावा लागणार आहे.
इच्छुक जागामालकांनी आपले लेखी अर्ज अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ६ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
नवीपेठ परिसरात पोस्ट ऑफिससाठी योग्य जागा उपलब्ध झाल्यास नागरिकांना टपाल व इतर डाक सेवांचा अधिक सुलभ लाभ मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पात्र व इच्छुक मालकांनी मुदतीपूर्वी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन डाक विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)