
लातूर, 23 जून (हिं.स.) : लातूर जिल्ह्यातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या दिशेने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत वाहनचोरीच्या पाच गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून सुमारे २ लाख १० हजार रुपये किंमतीच्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सतीश सुभाष कदम (वय ३४, रा. चनई, ता. अंबाजोगाई, जि. बीड) असे आहे.
लातूर शहर व परिसरात घडलेल्या वाहनचोरीच्या घटनांचा तपास सुरू असताना शिवाजीनगर पोलिसांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तातडीने कारवाई करून संशयिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन, गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील दोन, लातूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एक तसेच आंध्र प्रदेशातील एका गुन्ह्यासह एकूण पाच गुन्ह्यांमधील सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. जप्त वाहनांची एकूण किंमत अंदाजे २ लाख १० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत झाली असून आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis