
दुबई, 23 जून (हिं.स.) : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या २०२६ टी-२० विश्वचषकात सातत्याने प्रभावी कामगिरी केल्यामुळे, भारताची उदयोन्मुख फिरकीपटू श्री चरणी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाची गोलंदाज बनली आहे. या स्पर्धेत भारताच्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या चरणीने केवळ तीन सामन्यांत १० बळी घेतले आहेत. विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तिने ३/२४ अशी कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर तिने लिन्सी स्मिथला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. इंग्लंडसाठी खेळताना तीन सामन्यांत केवळ तीन बळी घेतल्यामुळे स्मिथची दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर चरणी दुसऱ्या स्थानावरून थेट अव्वल स्थानी पोहोचली. ऑफ-स्पिनर चार्ली डीन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत चरणीने भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. १० बळींसह ती या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली आहे. तसेच, एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्याच्या भारतीय गोलंदाजाच्या विक्रमाशी तिने बरोबरी केली आहे. यापूर्वी २०२० च्या विश्वचषकात पूनम यादवने हा विक्रम नोंदवला होता. टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत इतरही अनेक बदल दिसून आले आहेत. यात इंग्लंडची फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन चार स्थानांची प्रगती करत चौथ्या क्रमांकावर पोहोचली, तर पाकिस्तानची फिरकीपटू सादिया इक्बाल दोन स्थाने वर सरकली. या ताज्या क्रमवारीत लॉरेन बेल चार स्थानांनी घसरून सातव्या क्रमांकावर आली आहे. भारताची दीप्ती शर्माला तीन स्थानांनी नुकसान झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे