मृगाचा पाऊस लांबल्याने अचलपूर तालुक्यात पेरण्या खोळंबल्या
अमरावती, 23 जून (हिं.स.) : मृग नक्षत्रातील पाऊस लांबल्याने अचलपूर तालुक्यातील सुमारे 40 हजार हेक्टर क्षेत्रातील तूर आणि कपाशीसारख्या नगदी पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी जोखीम पत्करून पेरणी केली असली तरी पावसाअभावी त्यांच्या चिंत
अचलपूर तालुक्यातील ४० हजार हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या मृगाचा पाऊस लांबल्याने फटका


अमरावती, 23 जून (हिं.स.) : मृग नक्षत्रातील पाऊस लांबल्याने अचलपूर तालुक्यातील सुमारे 40 हजार हेक्टर क्षेत्रातील तूर आणि कपाशीसारख्या नगदी पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी जोखीम पत्करून पेरणी केली असली तरी पावसाअभावी त्यांच्या चिंतेत भर पडली असून सर्वांचे लक्ष आता आकाशाकडे लागले आहे.

अचलपूर तालुक्यात संत्रा हे प्रमुख पीक असून त्यानंतर कपाशी, तूर आणि सोयाबीनचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. चमक, अचलपूर, बोपापूर, धोतरखेडा, गौरखेडा, एकलासपूर आणि खरपी परिसरात मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. तर सावळापूर, कोल्हा, काकडा, शिंदी, असदपूर, चौसाळा, इसेगाव आणि इसापूर परिसरात कपाशी, तूर, सोयाबीन तसेच विविध भाजीपाला पिकांची लागवड केली जाते.

मागील काही वर्षांपासून कपाशीला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच यंदा पावसाने दडी मारल्याने तडणीवर सोडलेल्या अनेक संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बागांमधील 20 ते 25 टक्के संत्रा झाडे वाळल्याने दीर्घकालीन आर्थिक फटका बसला असून शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

कडक उन्हामुळे पेरलेल्या पिकांचे अंकुर खुंटले असून अनेक ठिकाणी बियाणे उगवलेच नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आधीच खर्च केलेल्या शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.

दरम्यान, कृषी विभागाने पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, अशा सूचना शेतकऱ्यांना दिल्या होत्या. मात्र काही शेतकऱ्यांनी जोखीम पत्करत पेरणी केली आहे. तालुक्यात आतापर्यंत सुमारे 800 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी माळवे यांनी दिली.

पावसाचा लांबलेला खंड कायम राहिल्यास खरीप हंगामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande