
बीड, 23 जून (हिं.स.)। दारूबंदी असलेल्या तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धडक कारवाई करून अवैधरीत्या साठवून ठेवलेला विदेशी मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत ३४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी निरीक्षक एस.एस. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने साक्षाळपिंप्री येथील एका घरावर छापा टाकला. तपासणीदरम्यान परसराम पांडुरंग काशीद (वय ३१, रा. साक्षाळपिंप्री, ता. जि. बीड) याच्या ताब्यात विविध बँडच्या विदेशी मद्याच्या व बिअरच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत ३६ रॉयल स्टॅग, २४ इम्पीरिअल ब्ल्यू, २२ क्लासिक गोल्ड, २१ ग्रैंड मास्टर मेलन व्होडका, २० रॉयल चॅलेंज तसेच १२ बडवाईजर व १२ किंगफिशर बिअरच्या बाटल्या असा एकूण ३४ हजार ४०० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ (सुधारित २०१८) च्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंद झाला आहे.
आरोपीस बीएनएसएसच्या कलम ३५ (३) नुसार नोटीस बजावून पुढील न्यायालयीन व चौकशी प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याच्या अधीन राहून सोडण्यात आले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध मद्यविक्री, साठा व वाहतुकीविरुद्ध विशेष मोहीम सुरू ठेवली असून, अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis