
लातूर, 23 जून (हिं.स.)। राज्य शासन महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवीत आहे. यासोबतच विविध शासकीय विभागांच्या योजनांमध्ये महिला बचतगटांनाही प्रोत्साहन देण्यात येत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) या विभागांशी समन्वय ठेवून महिला बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज येथे दिल्या.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संजय इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. श्रीधर शिंदे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक प्रमोद पाटील, कौशल्य विकास सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी, जिल्हा ग्रामउद्योग अधिकारी चिंतामणी गुट्टे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मनरेगामधून रोपवाटिका निर्मिती, कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पोकरा प्रकल्पात समाविष्ट गावांमध्ये अवजारे बँक यासाठी महिला बचतगटांना प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून संबंधित विभागाशी समन्वय साधून या योजनांचा लाभ महिला बचतगटांना द्यावा. यासोबतच कुक्कुटपालन, शेळीपालन आदी व्यवसाय उभारणीसाठीही बँकेचे सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड म्हणाले.
प्रारंभी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे यांनी महामंडळाच्या जिल्ह्यातील कामकाजाची माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis